दिघोडे येथे आदिवासी महिलेवर बलात्कार आणि गळा चिरून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ एका आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ माजली आहे. जवळच असणाऱ्या कंठवली कातकरवाडी येथील ही महिला असून अनुसया प्रल्हाद कातकरी (32) असे या महिलेचे नाव आहे. उरण पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दिघोडे हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या निर्जन जागेवर या महिलेचा मृतदेह सापडला होता. रविवार संध्याकाळी याची बातमी उरण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेच्या अंगावरील कपडे काढलेले होते. विवस्र अवस्थेत असलेल्या मृतदेहावर मारलेल्याच्या खुणा तसेच गळा धारदार शस्त्राने कापलेला होता. या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या खून प्रकरणी उरण पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या खुनाचा लवकरच तपास लागेल असे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.