
सरकारकडून त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जमिनी बळकावून हजारो शेतकऱयांना बेघर व भूमीहीन केले जात आहे. याविरुद्ध उपोषण करणाऱया शेतकऱयांची गुरुवारी भेट घेऊन शिवसेना पदाधिकाऱयांनी पाठिंबा जाहीर केला.
शासनाच्या आदेशाने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर रोडवरील हजारो मालमत्तांचे बांधकाम उद्ध्वस्त करून कोटय़वधी रुपयांचे नुकसान केले. दहाहून अधिक गावांना आणि चार ते पाच हजार शेतकऱयांना याचा मोठा फटका बसला आहे. ही कारवाई रद्द करावी, नुकसान भरपाई द्यावी, यासाठी नऊ दिवसांपासून पैलास खांडबहाले यांच्यासह शेकडो शेतकरी महिरावणी येथे साखळी उपोषणास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तोंडी स्वरुपात तात्पुरती स्थगिती दिली. मात्र, कारवाई थांबविण्याचा अंतिम आदेश काढलेला नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
गुरुवारी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, जगन आगळे, भैया मणियार, मसूद जिलानी, राहुल दराडे आदींनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलक पैलास खांडबहाले, उत्तम खांडबहाले यांच्याशी चर्चा केली. शेतकरी हितासाठी शिवसेना सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
शेतकऱयांच्या जागा बळकावणे थांबवा! संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱयांच्या जागा बळकावण्याचा घाट घातला आहे. अधिकृत बांधकाम बेकायदेशीर ठरवून घरे, हॉटेल, दुकानांवर बुलडोझर फिरवून शेतकरी, व्यावसायिकांना बेघर, बेरोजगार केले आहे. या तीन ते चार हजार बाधितांवरील अन्यायाची गंभीर दखल घेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. प्राधिकरणाची बेकायदेशीरपणे सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, पाडलेल्या घरे, दुकाने आदींच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱयांना आर्थिक मदत द्यावी, प्राधिकरणाचे 100 मीटर रस्त्याचे धोरण रद्द करावे, नाशिक महापालिका हद्दीप्रमाणे संपूर्ण रस्ता 45 मीटरचा ठेवण्याचे धोरण राबवावे, त्यासाठी नियमात आवश्यक बदल करावेत, प्राधिकरणाने रितसर पंचनामे करून आवश्यक जागा भूसंपादन कायद्याप्रमाणे संपादित करावी, शेतकरी व संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला द्यावा, बेकायदेशीरपणे विनामोबदला जमिनी ताब्यात घेऊ नयेत, या मागण्या करण्यात आल्या आहेत. पुंभमेळा हा नाशिकच्या पंचवटी भागातील गोदावरी नदीकिनारी व त्र्यंबकेश्वरला कुशावर्त येथे होत असतो, त्यामुळे पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी या ठिकाणी गर्दी किंवा चेगराचेंगरी होऊ शकत नाही, याकडे लक्ष वेधून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेतकऱयांवर अन्याय करणे थांबवा, असे म्हटले आहे.
 
             
		




































 
     
    





















