तृणमूल काँग्रेसने थोपटले दंड; एसआयआरविरोधात उद्या कोलकात्यात मोर्चा

बोगस मतदार यादी व दुबार मतदारांवरून देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात काहूर माजले असतानाच आता मतदार फेरतपासणी (एसआयआर) विरोधात आता तृणमूल काँग्रेसने दंड थोपटले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 4 नोव्हेंबरला कोलकाता येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.

पेंद्रीय निवडणूक आयोगाने 12 राज्यांसहित केंद्र शासित प्रदेशांमध्ये राष्ट्रव्यापी एसआयआर करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत अंदमान-निकोबार द्विपसमूह, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, लक्षद्विप यांचा समावेश आहे. यात 51 कोटी मतदारांची छाननी होणार आहे. या माध्यमातून अनेक मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती पश्चिम बंगालमधील मतदारांना आहे. त्या भीतीने दोन जणांनी आत्महत्याही केल्या आहेत.

वैध मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. वैध मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर, तृणमूल काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपने मात्र तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत.