
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या तीन दिवसांपासून मुर्शिदाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी मंगळवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच या आरोपींकडून एक बंदूक आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश एसके आणि बॉबिन एसके असे या दोन आरोपींची नावे आहेत. तर मावला बक्ष मंडल असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मुर्शिदाबादच्या हरिहरपारा येथील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावलाच्या घराजवळ या गुंडांनी त्याच्यावर दोन राउंड फायर केले. यामुळे त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली. यावेळी त्याला तातडीने हरिहरपारा ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र काही वेळाने त्याची प्रकृती बिघडल्याने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्याला उपचारांसाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या मावला बक्ष मंडल यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला जुन्या वैमानस्यातून झाला असल्याचे त्यांनी सांगितले. “मी माझ्या घराशेजारी बसलो होतो, अचानक तीन लोक आले आणि माझ्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी माझ्या डाव्या हाताला लागली,”असे मंडल म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही गोळीबाराची घटना झाली त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहरामपूर सर्किट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या मुर्शिदाबाद दौर्यावर असताना त्यांनी हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली आणि सुती येथे एका जाहीर सभेत नागरिकांना संबोधित केले.