
सामना प्रतिनिधी । चारठाणा
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे गावालगत हत्तीअंबीरे गॅस एजन्सीजवळ असलेल्या मेन रोडवर एका १६ टायरच्या ट्रकचा विद्युत तारेस स्पर्श होऊन वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. दरम्यान, मयत व्यक्तीस वाचविण्याच्या प्रयत्नात एक जण गंभीर झाला असून घटनास्थळी चारठाणा पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. गंभीर व्यक्तीस परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे आज सायंकाळी खत रिकामा करुन एक १६ टायर ट्रक (एम.एच. २२ए.एन. ९३९६) चारठाण्याहून परत परभणीकडे जात होता. मात्र रस्त्यामधून गेलेल्या मुख्य विद्युत तारेला ट्रकचा स्पर्श होऊन वाहनचालक त्रिंबक मुंजाजी काचगुंडे (रा. ३५ कुंभकर्ण टाकळी) यांचा जागीच मृत्यू झाला. या ट्रकच्या समोरील व मागील टायर जागेवरच फुटले आहे. यावेळी सायंकाळच्या सुमारास गावात जात असताना कृष्णा संभाआप्पा गजमल यांनी ही घटना पाहताच मतदीसाठी धाव घेतली. वाहनचालकास वाचवण्यासाठी प्रयत्न करत आसताना ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचाराकामी येथील जिंतूर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, जमादार सूर्यकांत राऊत, पोलीस कॉस्टेबल बळीराम ईगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकाचा बळी
हत्तीअंबीरे गॅस एजन्सीजवळ असलेल्या डिपीमधून मेन रोडवर जाणारी विद्युत तारा रोडलगत लोंबकाळलेल्या असून याकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. या मुख तारा उंच असत्या तर आजची घटना घडली नसती.





























































