खरा विकास रेवडी वाटपाने नाही, मदतीचा हात दिल्याने होतो, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा मोदी सरकारला घरचा आहेर

निवडणुकांवर डोळा ठेवून लाडकी बहीणसह विविध योजना आणणाऱ्या मोदी सरकारला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीच घरचा आहेर दिला आहे. समाजाचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण किंवा विकास मदत केल्याने होते, मोफत रेवडी किंवा धान्य आणि विविध वस्तूंचे मोफत वाटप केल्याने नाही, असे वक्तव्य धनखड यांनी केले आहे. जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा संतुलित आर्थिक आणि सामाजिक विकास होतो असेही त्यांनी म्हटले आहे.

मेघालय येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. एखाद्याला मोफत रेवडी वाटप किंवा भेटवस्तूंचे वाटप करून सक्षणीकरण होत नाही. खऱया अर्थाने सक्षमीकरण आणि विकास तोच आहे ज्यांना मदतीचा हात देऊन सक्षम बनवले जाते. मदत केल्याने आनंद मिळतो, संतुष्टी मिळते, तुम्हाला आंतरिक शक्ती मिळते आणि तुमच्याबद्दल तुमच्या कुटुंबियांना अभिमान वाटतो, असेही धनखड म्हणाले.

ईशान्य देशाचा दागिना

ईशान्येकडील राज्ये देशाचा दागिना आहेत. 1990 च्या दशकात केंद्र सरकारने लुक ईस्ट धोरण सुरू केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला लुक ईस्ट आणि अॅक्ट ईस्ट असे धोरण राबवले. त्याची अतिशय प्रभावीरित्या अंमलबाजवणी केली, असेही धनखड म्हणाले. दम्यान, मणिपूर जळत असताना, रक्तपात होत असताना मोदी आजतागायत मणिपूरमध्ये गेले नाहीत. हे लक्षात घेता धनखड यांनी मोदींच्या धोरणाचे काwतुक केल्याने राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची शक्यता आहे.