फुलांचा वर्षाव, प्रचंड गर्दी अन महापौरांविरुद्ध घोषणाबाजी, तुकाराम मुंढेंना नागपूरकरांनी दिला निरोप

फुलांचा वर्षाव, प्रचंड गर्दी आणि शेकडोंच्या डोळ्यात पाणी या आठवणीने तुकाराम मुंढे यांना हजारो नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला. एखाद्या सनदी अधिकारी करीता असा निरोप क्वचितच बघायला मिळतो. we miss u मुंढे सर… पुन्हा नागपुरात या… म्हणत शेकडो नागरिकांनी आपल्या अश्रुला अखेर वाट मोकळी करून दिली.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आज ते मुंबईला रवाना झाले. त्यांना निरोप देण्यास आलेल्या नागरिकांनी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त आहेत. पण बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे हे आज ते मुंबईला जात असता त्यांच्या समर्थानात नागपूरकर आज सकाळी रस्त्यावर उतरले. तर त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. आपल्या स्पष्ट आणि रोखठोक कामामुळे तुकाराम मुंढे हे नागरिकांच्या मनातले अधिकारी आहेत.

तुकाराम मुंढे हे आज त्यांच्या कुटुंबासह मुंबईला निघाले होते. तेव्हा नागपूरकरांनी मोठा फुलांचा वर्षाव केला आणि त्यांच्या गाडीच्या पुढे येऊन गाडी अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला. त्यावेळी मुंढे यांनी गाडीच्या बाहेर येऊन नागरिकांचे अभिवादन स्वीकारत आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर नागपूरकरांनी त्यांच्या गाडीला वाट करून दिली. यावेळी नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. नागपूरवासियांनी महापौर मुर्दाबाद आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात मुर्दाबाद असे नारेसुद्धा लावले, यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली  होती.

तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती. शेकडो नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी केली तर काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठविणार असल्याचे यावेळी सांगितले. पहिल्यांदाच एखाद्या सनदी अधिकाऱ्यावर नागपूरकरांनी एवढे प्रेम केल्याचे चित्र बघायला मिळाले.

बाय, बाय..! कठोर निर्णय घेणारे तुकाराम मुंढे झाले भावुक, फेसबुक पोस्ट व्हायरल

नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्याकरिता भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या नावाचे फलक रस्त्याच्या दुतर्फा घेऊन उभे होते. सर्व नागरिकांचे विनम्रतेने अभिवादन स्वीकारत तुकाराम मुंढे नागपूर विमानतळाकडे आपल्या कुटुंबियांसह रवाना झाले. मुंढे हे तब्बल सात महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते याकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागपूरकरांची माने त्यांनी जिंकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या