राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यात्रेवर नरभक्षक वाघाचे सावट

27

सामना प्रतिनिधी । अमरावती

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथे सुरू असलेल्या यात्रेवर नरभक्षक वाघाचे सावट पसरले आहे. त्यामुळे राष्ट्रसंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या घटली आहे. आतापर्यंत हा नरभक्षक वाघ वनविभागाच्या तावडीत सापडला नसल्यामुळे धामणगाव आणि तिवसा तालुक्यातील सर्वत गावात दहशतीचे वातावरण आहे.

गेल्या 8 दिवसांपासून हा नरभक्षक वाघ धामणगांव आणि तिवसा तालुक्यात भटकत आहे. या वाघाने 3 दिवसांपूर्वी अंजनसिंगी येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या मोरेश्वर वाळके या 50 वर्षीय व्यक्तीचा फडशा पाडला. यासोबतच मंगळुर दस्तगीर येथे राजू निमकर नावाच्या शेतकऱ्याला लक्ष्य केले. दोन दिवस धामणगाव तालुक्यात या वाघाने धुमाकुळ घातल्यानंतर आता हा नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात आला आहे. गुरुवारी या वाघाने रघुनाथपूर येथे एका वासराला जीव घेतली. ही घटना ताजी असतानाच बिबट्याचे देखील जंगलात वास्तव्य असल्याचे दिसून आले. बिबट्याने विरगव्हाण येथील शेतशिवारात रोहिच्या पिल्लांची शिकार केली.

धामणगाव रेल्वे आणि तिवसा तालुक्यातील नागरिक वाघाच्या वावरामुळे दहशतीखाली आहेत. वाघाला मारण्याची परवानगी नसल्याने वनविभाग त्या परवानगीची वाट पाहात आहे. धामणगावचे आमदार विरेंद्र जगताप आणि तिवसाचे आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी वनमंत्र्यांची संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्तर करा असा आग्रह धरला आहे. वाघाच्या भितीने शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतात जाणेच सोडून दिले आहे. तर काही गावातील नागरिक गटागटाने हातात लाठ्या-काठ्या घेऊन संरक्षण करण्याच्या तयारीला लागले आहेत.

एकीकडे दोन्ही तालुक्यात नरभक्षक वाघाची दहशत असताना तिवसा तालुक्यात असलेल्या मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे. 22 तारखेपासून सुरू झालेल्याया सप्ताहाची सांगता 29 तारखेला होणार आहे. त्यामुळे यात्रेच्या भाविकांवर वाघाची दहशत पसरली आहे. परिणामी यात्रेत होणारी गर्दी यंदा कमी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या