>> सूरज बागडे, भंडारा
एकीकडे नळाला पाणी मिळत नाही दूसरीकडे पाईप लाईन फुटली असून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालित पाणी वाया जात असून तेच पाणी नागरिक भरत असल्याचा धक्कादायक प्रकार तुमसर येथे समोर आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मालवीय नगरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीतून गेलेल्या जलवाहिनीतून नागरिक पाणी भरत आहे. परिसरात पाणीटंचाई असल्याने नागरिकांच्या नळाला बरोबर पाणी येत नाही. दुसरीकडे पाईप लाईन फुटली असून देखील नगर परिषद दुरुस्ती करत नाही. त्यामुळे नागरिक चक्क नालीत भांडी ठेवून पाणी घेत आहेत. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालवीय नगरात सांडपाणी वाहून जाणारी मोठी नाली आहे. या नालीच्या वरून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून नागरिक चक्क नालीत खाली उतरून कुटुंबाकरिता पाणी नेतात. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून आम्ही पाणी नेतो, असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे हे दृश्य लक्षं वेधून घेत आहे. परंतु हे प्रकार थांबावे म्हणून कुणीही पुढाकार घेत नाही, ही एक शोकांतीकाच म्हणावी लागेल.
येथे मागील अडीच वर्षापासून प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज उचलणारा कोणीच नाही. पाण्याकरिता येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. तुमसर शहरापासून केवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी वाहत असतानाही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत.