तूर डाळीच्या सालीत दुधापेक्षा सहापटीने अधिक कॅल्शियम, संशोधनातून उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांपैकी एक म्हणजे तूर डाळ. तुरीच्या डाळीचं वरण, तुरईची उसळ इत्यादी पदार्थांचं आपण अनेकदा सेवन करतो. याच तुरीच्या डाळीच्या सालीत दुधापेक्षा 6 पट अधिक कॅल्शिअम असल्याचं संशोधनातून उघड झालं आहे.

इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च इन सेमी-अरिड ट्रॉपिक्स या संस्थेच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, 100 ग्रॅम तूर डाळीच्या सालीत 652 मिग्रॅ इतकं कॅल्शियम असतं. तर 100 मिली दुधात 120 मिग्रॅ इतकं कॅल्शियम आढळतं. म्हणजेच तूर डाळीच्या सालीत आढळणाऱ्या कॅल्शियमचं प्रमाण हे दुधाच्या सहापट अधिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

तूर डाळीच्या सालीचा वापर आहारात केल्याने हाडांची झीज, अस्थिभंग अशा विविध आजारांवर उपचार होऊ शकतात. जेव्हा तुरईपासून तूर डाळ बनवली जाते, तेव्हा ही साल वेगळी करण्यात येते. डाळ तयार झाल्यानंतर वेगळ्या झालेल्या या सालीला एकतर कचऱ्यात टाकलं जातं किंवा जनावरांना चारा म्हणून टाकण्यात येतं.

वास्तविक एका मानवी शरीराची कॅल्शिअमची गरज ही प्रतिदिन 800 मिग्रॅ ते 1 ग्रॅम इतकी असते. पण, रोजच्या आहारात इतकं कॅल्शिअम शरीराला आहारातून मिळेलच असं नाही. तुरीच्या सालीत आढळणारं प्रमाण हे तांदूळ, गहू किंवा ओट्सच्या सालीहून कितीतरी अधिक आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.