
ठाणे माजिवडा येथील एका टॉवरच्या विसाव्या मजल्यावरून कोसळून एका कासवाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासवाचा मालक प्रतिक चोरे याच्याविरुद्ध पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पशुप्रेमी संघटनांनी त्याच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
माजिवडा बाळकुम पाडा, हायलँड हेवन येथील ‘कोरल’ इमारतीमध्ये ही घटना घडली. रात्री साडेदहाच्या सुमारास एक कासव इमारतीमधून खाली कोसळून जागीच मरण पावले. सुरक्षारक्षक व अन्य नागरिकांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केल्यानंतर कासवाचा मालक चोरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ते कासव लाल रंगाच्या कानाचे ‘रेड एअर्ड स्लायडर टर्टल’ या जातीचे होते, असे पुंजू यांनी सांगितले. मालकाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लॅन्ट अॅन्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी-मुंबई (पॉज) या पशुप्रेमी संस्थांना ही माहिती इमारतीमधील रहिवाशांनी दिली. चोरे याने ते कासव आपल्या मालकीचे नव्हते, असा दावा केला आहे असे ‘पॉज’चे सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

































































