
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्येष्ठ कायदेतज्ञ तुषार मेहता यांची हिंदुस्थानचे नवे सॉलिसिटर जनरल (महाधिवक्ता) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधानपद, भाजप अध्यक्षपद, वित्त सचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या पदांपाठोपाठ सॉलिसीटर जनरल हे पदही ‘गुजराती’ व्यक्तीकडे गेले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिंदुस्थानच्या सॉलिसिटर जनरलपदी नियुक्तीसाठी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मागील 11 महिन्यांपासून हे पद रिकामे होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर 2014 मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम 66 अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.




























































