नवीन वर्षात खिशाला दणका बसणार, ‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन इंग्रजी वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. अशातच नवीन वर्षात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दणका बसण्याची शक्यता आहे. 2021 च्या सुरुवातीलाच इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होणार आहेत. या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने या वस्तूंच्या किंमतींमध्ये जवळपास 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी लोखंड, पितळ, अॅल्यूमिनियम आणि स्टीलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार आहेत. या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या एलजी, पॅनासोनिक आणि थॉमसन यांनीही जानेवारीमध्ये किंमतीत वाढ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र सोनी कंपनीने अद्याप याबाबत घोषणा केलेली नाही.

पॅनासोनिक इंडियाचे सीईओ मनिष शर्मा यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये किंमतीत 6 ते 7 टक्के वाढ केली जाईल, मात्र येणाऱ्या काळात ही वाढ 10 ते 11 टक्के असेल. वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे एलजीने देखील 1 जानेवारीपासून किंमतीत 7 ते 8 टक्के वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या प्रमुखांनी सांगितले की, हिंदुस्थानमधील उत्पादन (टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज इ.) च्या किंमती 7 ते 8 टक्क्यांनी वाढल्या जातील. क्रुड ऑईलच्या किंमती आणि रॉ मटेरियलच्या वाढत्या किंमती यास जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

एलईडी टीव्हींची मागणी वाढली

दरम्यान, हिंदुस्थानमध्ये गेल्या काही काळात छोट्या आकाराच्या एलईडी टीव्हींची मागणी वाढली आहे. आगामी काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता असून या टीव्हींची किंमतीही पुढील वर्षी वाढणार आहे.