
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाची पूर्वतयारी राजकीय पक्षांच्या गोटात सुरू झाली असतानाच दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या युतीसाठीच्या हालचालींची चर्चा जोरात आहे.
‘आप’चे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस-यूपीएचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ट्विटरवरून स्तुती सुमने उधळली होती. डॉ. सिंग यांच्यासारख्या उच्च शिक्षित पंतप्रधानांची देशाला आजघडीला प्रकर्षाने आठवण येते, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. इतकेच नव्हे तर, शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उमटलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चिमटा काढला होता. त्यामुळे काँग्रेस आणि आप यांच्या युतीची शक्यता बळावली आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
युतीसाठी काँग्रेस आणि ‘आप’च्या नेत्यांमध्ये २४ मे रोजी अनौपचारिक बोलणी झाल्याचेही वृत्त आहे. त्या दोन पक्षांतील वाटाघाटींमध्ये ‘आप’ने दिल्लीतील सातपैकी दोन जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली, मात्र काँग्रेसने तीन जागांचा आग्रह धरला, असे सांगण्यात येते.
नवी दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून शर्मिष्ठा मुखर्जी, चांदनी चौक या जागेवर अजय माकन तर पश्चिम दिल्ली येथून राजकुमार चौहान यांना काँग्रेस रिंगणात उतरवू इच्छिते, अशी चर्चा आहे.
काँग्रेस ‘आप’शी कशाला युती करेल? – माकन
देशात मोदी नावाच्या राक्षसाचा उदयच मुळात अरविंद केजरीवाल यांच्यामुळे झाला आहे, असा आरोप करतानाच काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आमचा पक्ष ‘आप’शी युती कशाला करेल, असा सवाल केला. त्या दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत बोलणी झाल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले असून जनता ‘आप’ला नाकारत आहे, असे माकन यांनी सांगितले. तर ‘आप’चे नेते दिलीप पांडे यांनी युतीसाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही असून आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला. काँग्रेसला हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमध्ये आमची साथ हवी आहे, असे सांगून ते म्हणाले की, ‘आप’ला काँग्रेसची नाही, तर काँग्रेसला ‘आप’ची गरज आहे.
‘आप’चे पाच उमेदवार तयार
‘आप’ने लोकसभेच्या ७ जागांपैकी ५ जागांवर प्रभारी नियुक्त करून टाकले आहेत. उरलेल्या दोन जागांवर प्रभारी नियुक्त करण्याबाबत सध्या खल सुरू आहे. या प्रभारींनाच नंतर त्या त्या जागांवरील उमेदवार म्हणून घोषित केले जाईल, असे मानले जात आहे.
अजय माकन हे दिल्ली काँग्रेसची दिशाभूल करत आहेत. नंतर तेच म्हणतील की, मी तर युतीला विरोध केला होता, पण मी नवी दिल्ली की पश्चिम दिल्ली येथून युतीचा उमेदवार म्हणून लढायचे, याचा निर्णय हायकमांडच घेईल.
– अलका लांबा, प्रवक्त्या, आम आदमी पार्टी
























































