नगरमध्ये अडीच हजार कर्मचारी कामावर हजर, एसटीच्या फेऱ्या वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱयांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर नगर विभागात दोन हजार 450 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत 90 टक्क्यांहून अधिक कर्मचारी हजर होतील व बसच्या फेऱयांची संख्या वाढून एसटी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होईल, असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर 2021च्या शेवटच्या आठवडय़ापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तरीही कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचाऱयांनी 22 एप्रिलपर्यंत डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले तर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही. जिह्यात संपाआधी तीन हजार 520 कर्मचारी कामावर हजर होते. न्यायालयाच्या आदेशानंतर जिह्यात आतापर्यंत दोन हजार 450 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

एसटीच्या फेऱया वाढणार

सध्या जिह्यात एसटीच्या 350 बसेस सुरू असून, त्याद्वारे दीड हजार फेऱया होत आहेत. मात्र, पूर्ण कर्मचारी हजर झाल्यानंतर एसटीच्या फेऱयाही वाढणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या बंद असणाऱया एसटीची देखभाल-दुरुस्ती सुरू आहे.