महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक

रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून रिक्षातून पळून गेलेल्या दोघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. रिझवान अन्वर शेख अणि इम्रान मोहम्मद हनीफ अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी गुह्यातील रिक्षा जप्त केली आहे.

तक्रारदार या तीन दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील एम. जी. रोडने पायी जात होत्या. तेव्हा अचानक त्यांच्या बाजूने एक रिक्षा गेली.  रिक्षात बसलेल्यांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून रिक्षातून पळ काढला. सोनसाखळी चोरीनंतर त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर एपीआय शिव भोसले व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात पोलिसांना एका रिक्षाचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी रिझवान आणि इम्रान या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुह्यातील एक लाख रुपयांची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. यातील रिझवान हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध कांदिवली, समतानगर, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात 13 वर्षांपूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या