
सामना प्रतिनिधी । नागपूर
अवैध रेती वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदाराच्या अंगावर ट्रक चढवून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणी बुधवारी उमरेड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शाहरूख शेख हारून शेख (वय 24, बहादुरा) व अविनाश उर्फ अश्विन प्रल्हाद ढोणे (वय 25, पाचगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शाहरूख शेख हारून शेख हा ट्रकचा चालक मालक आहे. तहसीलदार कदम यांना ट्रक फरफटत नेत असताना ट्रक मागून बलोरो गाडी पाठलाग करीत होती. ही गाडी अश्विन प्रल्हाद ढोणे चालवित होता.
उमरेड तालुक्याचे तहसीलदार प्रमोद कदम व योगेश शिंदे हे दोघे मंगळवारी नेहमीप्रमाणे ट्रकची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यांना एक रेती वाहून नेणारा ट्रक दिसला. ट्रकला थांबवून कागदपत्रे तपासण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने ट्रक थांबविण्याऐवजी दोघांवर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला असता सावध असल्यामुळे दोघेही त्यातून वाचले.


































































