
सामना प्रतिनिधी । बिडकीन
बिडकीन बसस्थानक परिसरात खुलेआम तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मंगळवार, २१ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बिडकीन बसस्थानक परिसरामध्ये संतोष हनुमंत गायकवाड (३५), प्रवीण उत्तम केदारे (३२, रा. गेवराई, ता. जि. संभाजीनगर) हे दोघे तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक देशमुख, अनंत घोळवे, गणेश पैठणकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता दोघे दारूच्या नशेत तर्रर होते. त्यांच्याकडून चमचमत्या धारदार पात्याची साडेचार फूट लांबीची तलवार जप्त करण्यात आली. या दोघांनीही नांदेड येथून तलवार खरेदी केल्याचे सांगून, पैठण येथे नातेवाईकास देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.





























































