अंगावर वीज पडल्याने दोन बैल दगावले

60

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ

चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात झाडाखाली बांधलेल्या बैलांच्या अंगावर वीज पडल्याने दोन बैल दगावल्याची घटना घडली. ऐन पेरणी मोसमातच दांडगे बैल गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे.

वडवळ नागनाथ परिसरात गुरुवारी रात्री उशिरा अचानक मेघगर्जनेसह झालेल्या दमदार पाऊसा दरम्यान येथील शेतकरी गणेश बाबुराव भेटे यांच्या शेतात आखाड्याशेजारी शेवरी व बोरीच्या झाडाखाली बांधलेल्या बैलांच्या अंगावर विज पडल्याने दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांने माहिती देताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मुनीर मुजावर व कोतवाल विशाल लंगोटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला. तर वैद्यकीय अधिकारी अंकुश पाटील व पदमाकर कसबे यांनी बैलाचे शव विच्छेदन करून महसूल विभागाला रिपोर्ट सादर केले. सदर मयत बैलाची बाजारातील किंमत एक लाख वीस हजार रुपयांची बैलजोडी असल्याचे पंचनाम्यात नमुद केले आहे. पेरणी तोंडावर आली असताना ही घटना घडल्याने शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या