
निटूर (ता. निलंगा, जि. लातूर) येथे गावालगत ग्रामपंचायतीने खोदलेल्या नाल्यामध्ये पडून लहान दोन बहीण भावांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दोन जीव गेल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
निटूरमधील महेबूब इस्माल फकीर यांचा मुलगा अदील व मुलगी जोया ही पाच ते सात वयोगटातील बहीण भावंडे सकाळी अकरापासून खेळण्यासाठी गेलेली होती. घराकडे न परतल्याने त्यांच्या आई- वडिलांनी दुपारी शोधाशोध सुरू केली. शोध मोहीम सुरु असताना या दोन लहान मुलांच्या चप्पल ग्रामपंचायतीने खोदलेल्या नाल्यानजीक आढळल्या. यानंतर या दोघांचा नाल्यात शोध घेतल्यानंतर त्याठिकाणी त्यांचे मृतदेह मिळाले.
दरम्यान, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोन्हीही मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले असून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.





























































