
सामना प्रतिनिधी । सेनगाव
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हचारी उटी येथील ४ व ६ वर्षीय बालकाचा एका पुरातन बारवामधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद रात्री उशिरा झाली आहे.
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हचारी उटी गावातील मठाजवळ पुरातन बारव विहीर आहे. या बारवामध्ये गणेशोत्सवामधील सर्व लहान-मोठ्या गणपतींचे विसर्जन केल्यामुळे हे गणपती गावातील लहान मुले दररोज बघत. दरम्यान, या बारव विहीरीजवळ गावातील गोलु राजकुमार खराबे (६) व हर्षद राजकुमार खराबे (४) हे दोघे सख्खे भाऊ १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास खेळत होते. यावेळी बारावातील गणपती बघत असतांना हर्षद राजकुमार खराबे या ४ वर्षीय बालकाचा तोल गेल्याने तो बारावामध्ये पडला. हा प्रकार गोलु खराबे याच्या लक्षात येताच त्याने देखील भावाला वाचविण्यासाठी उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने आरडाओरड केली. त्यानंतर याबाबत सेनगाव पोलीसांना या घटनेची माहिती मयत मुलाचे आजोबा यांनी कळविली. त्यानंतर सेनगाव येथील पीएसआय एन.जी. मोरे यांच्या पथकाने उटी ब्रम्हचारी येथे घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने गोलु व हर्षद या दोन मुलांचा शोघ घेण्याचे काम रात्री ८ वाजेपर्यंत सुरु होते.
गोलु खराबे या मुलाचा मृतदेह फुगून वर आल्यामुळे त्याला १४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करुन सेनगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. तर हर्षद राजकुमार खराबे या ४ वर्षीय मुलाचा या बारावमध्ये नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी शोध रात्रभर घेतला. परंतु, तो सापडला नाही. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी हर्षद खराबे याचा मृतदेह बारावमध्ये फुगून वर आला. या दोन्ही मयत बालकांवर उटी ब्रम्हचारी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.






























































