छावणीत विषबाधा: दोन गायींचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

विषबाधेमुळे दोन गायी मृत होण्याची घटना तालुक्यातील रांजणी येथील जनावरांच्या छावणीत घडली असून या घटनेत एकूण सात जनावरांना विषबाधा झाली होती मात्र त्यातील पाच जनावरांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले.

पाथर्डी शहरा पासून सात कि.मी. अंतरावर रांजणी हे गाव असून या ठिकाणी असलेल्या जनावरांच्या छावणीत कौसल्या साळुंके यांच्या चार,महादेव भताने, आशा घोडके व बजाबा घोडके यांच्या प्रत्येकी एक अशा सात जनावरांना चार दिवसांपूर्वी विषबाधेचा त्रास होऊ लागल्या नंतर या सर्व जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल ढाकणे व डॉ. जगदीश पालवे यांनी उपचार सुरु केले. या शिवाय जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल तुंभारे यांच्या नेतृत्वा खालील पथकाने सुद्धा रांजणी येथे भेट देऊन विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले होते मात्र काल बुधवारी रात्री एक व आज सकाळी एक अशा दोन गायी या घटनेमध्ये मृत पावल्या.

मृत पावलेल्या जनावरांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज असून या घटनेची माहिती कळताच तहसीलदार नामदेव पाटील यांनी तलाठी पाठवून या घटनेचा पंचनामा केला तर मृत जनावरांचे शवविच्छेदन करून या जनावरांचे मांस व रक्त पुणे येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हा अहवाल आल्या नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असले तरीही हा प्रकार विषबाधातुन घडला असावा असा अंदाज डॉ. सुधाकर पालवे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेतील उर्वरित पाच जनावरांची प्रकृती सध्या चांगली असून जे जनावरे मृत झाली त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी छावणीतील जनावरांच्या मालकांनी केली आहे.