
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या प्रवाहासोबत वाहून आलेले दोन मृतदेह आढळले आहेत. पुलाच्या नळ्यात हा माय लेकराचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत. घटनेनंतर मृत महिलेचा पती फरार झाल्याने संशय वाढला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेवगाव पोलीस फरार झालेल्या महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील नदीच्या बंधाऱ्याजवळच्या पुलावर एक मुलाचे आणि महिलेचे प्रेत नागरिकांना आढळले. त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.त्यांची ओळख पटवण्यात आली असून मृत महिलेचे नाव ज्योती अंबादास सोनवणे आणि मुलाचे नाव दिपक अंबादास सोनवणे (वय 8) आहे.
दिपक, ज्योती आणि तिचे पती अंबादास सोनवणे रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बाहेर गेले होते. रात्री उशीरा अंबादास सोनवणे एकटेच घरी परतले. त्यांनी मुलगी प्रियंकाला तुझी आई आणि दिपक घरी आले का असे विचारले. ते अजून आले नाहीत,असे तिने सांगितले. त्यानंतर त्यांनी बोधेगाव पोलीस ठाण्यात ज्योती व दिपक सोनवणे दुपारपासून बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
मुलीला घरी सोडून ते पत्नी आणि मुलाला शोधून येतो असे सांगत घराबाहेर पडले. ते पुन्हा घरी आलेले नाहीत. गावातील नागरिक व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, तिघांची काहीही माहिती मिळाली नाही. परिसरात रात्री जोरदार पाऊस झाल्याने सकाळी शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील ठाकूर पिंपळगाव नदीला पाणी आले. त्या प्रवाहासोबत वाहत आलेले दोन मृतदेह पुलाच्या नळयांमध्ये अडकलेले नागरिकांना आढळून आले. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवली. ते मृतदेह ज्योती आणि दिपकचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. घटनेनंतर अंबादास सोनवणे फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे. त्याला शोधण्यासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.




























































