
कोरोना लसींची परिणामकता आणखी प्रभावी करण्यासाठी, लस तुटवडय़ावर मात करण्यासाठी दोन भिन्न कंपन्यांच्या लसी देण्याबाबत जगात विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस दिल्यानंतरही लस प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लसीची प्रतीक्षा करणाऱया देशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्वामिनाथन यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत दुसऱया कंपनीचा डोस देता येऊ शकतो. याआधी काही शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या वेरिएंटचा सामना करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची लस देण्याची सूचना केली होती. यामुळे वेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दीर्घकाळ सुरक्षा आणि रोगप्रतिकारकशक्ती मिळणार असल्याचे सांगत डॉ. स्वामिनाथन पुढे म्हणाल्या, दोन भिन्न लसी दिल्यानंतर दुष्परिणामही जाणवत आहेत. जर्मनी, ब्रिटन आणि स्पेनमधील आकडेवारीनुसार दोन वेगळ्या कंपन्यांच्या लसी घेणाऱयांना ताप, अंगदुखी आणि अन्य साइड इफेक्ट्स दिसून आले, मात्र हे इफेक्ट्स गंभीर नाहीत ही समाधानाची बाब आहे.
दोन भिन्न लसींच्या डोसमुळे उच्चस्तरीय अॅण्टीबॉडीज
दोन वेगवेगळ्या लसी व्यक्तीला दिल्यामुळे अधिक प्रतिसाद देणारी रोगप्रतिकारकशक्ती तयार होत आहे. यामध्ये उच्चस्तरीय अॅण्टीबॉडीज आणि पांढऱया पेशी तयार होत आहेत. या कोरोना विषाणूने प्रभावित पेशींचा खात्मा करतात. यादरम्यान काही देशांकडून लसीकरणाला वेग आणण्यासाठी दोन भिन्न लस देण्याबाबतची चाचपणी सुरू आहे. मलेशियामध्ये कोव्हिशिल्ड आणि फायझरची लस देण्याचा विचार सुरू आहे. हा उपाय प्रभावी ठरल्यास जगाला भेडसावणारी लसींच्या तुटवडय़ाची भीषण समस्या सुटायला मदतच होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) ठाम मत आहे.





























































