
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती एनक्लेव्ह हे खासगी निवासस्थान अखेर सोडले. 1 सप्टेंबर रोजी निवासस्थान सोडताना त्यांना निरोप देण्यासाठी तब्बल 24 वकील पोहोचले. सर्व वकील धनखड यांना निरोप देताना दक्षिण दिल्लीतील फार्महाऊसपर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
जोपर्यंत सरकार त्यांना दुसरे निवासस्थान उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत त्यांना दिल्लीतील खासगी निवासस्थानात राहावे लागणार आहे. सध्या धनखड इंडियन नॅशनल लोकदलचे नेते अभय चौटाला यांच्या मालकीच्या एका खासगी फार्महाऊसमध्ये राहत आहेत. 21 जुलै रोजी धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. मात्र, विरोधकांनी मोदी सरकारच्या षड्यंत्रामुळे आणि राजकारणामुळेच धनखड यांनी राजीनामा दिल्याचा आरोप केला.
दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे
धनखड यांना मिळणार तीन वेगवेगळी पेन्शन्स
जगदीप धनखड यांना तीन वेगवेगळी पेन्शन मिळणार आहेत. या पेन्शन्सच्या माध्यमातून त्यांना एकूण 2 लाख 87 हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. याशिवाय त्यांना इतर सुविधाही मिळणार आहेत. राजस्थानात माजी आमदारांना 35 हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळते. परंतु, 70 वर्षांहून अधिक वयाच्या आमदारांना 20 टक्के अतिरिक्त निवृत्ती वेतन मिळते. धनखड यांचे वय 74 असल्याने त्यांना 42 हजार रुपये मिळतील. तर माजी खासदार म्हणून त्यांना दर महिन्याला 45 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. तसेच माजी उपराष्ट्रपती म्हणून त्यांना जवळपास 2 लाख रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळणार आहे.