
देशभर गाजलेल्या तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन, पूजा-अभिषेक व तेल चढावा यातून शनिभक्तांची फसवणूक झाल्याप्रकरणी पाच बनावट ऍपवर दाखल गुह्यात तब्बल पाच महिन्यानंतर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्याना गुरुवारी (दि.4) रात्री सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या खात्यात एक कोटी रुपये चौकशीत आढळून आल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सचिन शेटे (रा. शनिशिंगणापूर), संजय पवार (रा. सोनई) अशी अटक केलेल्या कर्मचाऱ्याची नावे आहेत.
बनावट ऍप घोटाळाप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात 12 जुलै रोजी उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली होती. बनावट ऍप घोटाळासंबंधात शनिशिंगणापूरतील 18 जणांची चौकशी करण्यात आली. यामध्ये मंदिरातील पुजारी त्यांच्या जावई, पुतण्या, तसेच येथील मंदिरातील कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली. पूजा परिसेवा, घर मंदिर, हरी ओम, ऑनलाइन प्रसाद, ई-पूजा या ऍप यांनी शनिशिंगणापूर देवस्थान व अहिल्यानगर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेतली नव्हती. शनैश्वर देवस्थानला देणगी न देता यूआरएल संकेतस्थळ अज्ञात ऍपधारक मालक यांनी त्यांच्या साथीदारासह शनिशिंगणापूर येथील शनि महाराजांच्या शिळाचा फोटो, शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरला. बनावट ऍप धारकांचे कोणतेही पुजारी शनिशिंगणापुरात उपलब्ध नसताना त्यांच्या पुजाऱयामार्फत पूजा अभिषेक, तेल चढावा केला जाईल, असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रसारित केला आहे.
पावसाळी अधिवेशनात शनिशिंगणापूर देवस्थानचा बनावट ऍप घोटाळा प्रचंड गाजला. देवस्थानची 2 हजार 447 नोकरभरतीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरास सांगितले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार करणारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर तपासाची चक्रे जोरात फिरली.
अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मंदिरातील कर्मचारी व पुजाऱ्याची कसून चौकशी सुरू केली. जिल्हा पोलीसप्रमुख सोमनाथ घार्गे यांनी बनावट प्रकरणात दोन कर्मचारी निष्पन्न झाल्याचा दावा करत एक कोटी रुपयांचा दोन कर्मचाऱ्याकडून ट्रांजेक्शन झाल्याचे सांगितले. मात्र, चार ते पाच महिन्यांपासून या ऍप घोटाळ्यातील प्रमुखांना पोलिसांनी अभय दिल्याच्या उलटसुलट चर्चाला उधाण आले.
सोमवार (दि.8) पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे हे शनिशिंगणापूर देवस्थानचा गैरकारभाराबाबत पुन्हा प्रश्न मांडणार, अशी शक्यता व्यक्त होत असल्याने पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) रात्री दोन कर्मचाऱ्याना अटक केली आहे.
खंडपीठाचे निर्णय लांबणीवर
शनिशिंगणापूर देवस्थान राज्य सरकारने 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याचदिवशी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची प्रशासकपदी नियुक्ती केली. शासनाने नेमलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीला छत्रपती संभाजीनगर खंडपीठात देवस्थान न्यासच्या अध्यक्षांनी दाखल कलेल्या याचिकेत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला. 17 नोव्हेंबर रोजी खंडपीठाने निर्णय राखून ठेवला असल्याने निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे.



























































