
गरिबीमुळे आधीच कर्ज काढून कसेबसे पेरलेले बियाणेही अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे स्वप्नभंग झालेल्या दोन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडल्या आहेत. शरद गंभीर आणि काशीनाथ गवसाने अशी या शेतकऱयांची नावे आहेत. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱयांवर अस्मानी संकटच ओढवले आहे. दरम्यान, आत्महत्यांमुळे घरातील कर्ता माणूसच गेल्याने संबंधित कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने सर्व प्रकारची मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
…आणि गळफास घेऊन जीवन संपवले
कारी गावातील शरद गंभीर (45) यांनी कर्ज काढून साडेतीन एकर जमिनीत लिंबाची बाग केली, मात्र अतिवृष्टीमुळे ही बाग नष्ट झाली. त्यांच्या डोक्यावरील एकूण दहा लाखांचे कर्ज फेडणार कसे या चिंतेमधून त्यांनी दावणीने गळफास घेतला.
दहिटणे गावातील काशीनाथ गवसाने (58) या अल्पभूधारक शेतकऱयाने दीड एकर जागेत कोरडवाहू शेती केली होती, मात्र अतिवृष्टीने सर्व पीक नष्ट झाले. त्यामुळे कर्जफेड करणार कशी या विवंचनेत झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.