
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहूरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात २ शेळ्या ठार झाल्या आहेत. बाभुळगाव येथील भानुदास काशीनाथ पवार यांच्या वस्तीवर असलेल्या जनावरांच्या दावणीतील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवुन २ शेळ्या ठार केल्या. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे वनपाल यु.बी.लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
मुळा धरणाच्या जवळील बागायती भाग म्हणून बाभुळगावची ओळख आहे. भक्ष्याची सहज उपलब्धता तसेच ऊसाच्या शेतीत वास्तव्याची सुरक्षित व्यवस्था असल्याने या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे. बाभुळगाव परिसरातील शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापुर्वी देखील घडल्या आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांकडे केली आहे.

































































