
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्यात सध्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. राहुरीच्या गुंजाळे येथील नवले वस्तीत एक शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या दोन बकऱ्या अज्ञातांनी चोरल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री नवले यांच्या गोठ्यातील एक शेळी व एक बोकड चोरीला गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. राहुरी तालुक्यात सध्या चोऱ्या, घरफोड्या, वाळु तस्करी, शेतीची अवजारे, मोटरपंप चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बोकडाच्या पार्टीचा बेत फसला, चोरलेले बोकड खाताना आरोपी गजाआड
संजय नवले या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेली एक 6 हजार रुपये किंमतीची 3 वर्ष वयाची शेळी आणि एक 4 हजार रुपये किंतीचा 6 महिन्याचा बोकड मंगळवारी गोठ्यातून चोरीला गेला. बुधवारी सकाळी जेव्हा नवले आपल्या गोठ्यात गेले तेव्हा गोठ्यातून बकऱ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, राहुरीत चोऱ्या – घरफोड्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र बकरे चोरीची घटना प्रथमच घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरी गेलेल्या बकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
























































