
नगर शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून दुचाकीवरून पळून जाणाऱया दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सादक शमलखान इराणी व रियाज फय्याज इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत.
वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सादर इराणी हा त्याच्या साथीदारासह चेन स्नॅचिंग करून चोरलेले दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून पोलीस पथकाने श्रीरामपूर येथे सापळा रचला. यावेळी पोलिसांनी सादक इराणी व रियाज इराणी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अंगझडती केली असता, 22 ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे सापडली.
पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजय वेठेकर, दत्ता हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, सचिन आडबल, विशाल दळवी, राहुल सोळुंके, कॉन्स्टेबल आकाश काळे, रणजित जाधव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


























































