
मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे एका महिलेने अनोख्या मुलीला जन्म दिला आहे. नवजात मुलीला दोन डोकी आहेत. विशेष म्हणजे दुसरे डोके हे पायाच्या बाजुला आहे. सध्या बाळ आणि बाळंतीण बाईची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सध्या बाळाला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. दोन डोक्याचे बाळ जन्माला आल्याची बातमी पसरताच संपूर्ण जिल्ह्यात या मुलीलीच चर्चा सुरू आहे.
सरगुवा गावात राहणारी 24 वर्षीय पूजा हिला पती अंतू कुशवाहा याने प्रसव वेदना सुरू होताच बुधवारी रात्री बडामलहरा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. गुरुवारी सकाळी महिलेने बाळाला जन्म दिला. सकाळी आठ वाजता जन्मलेल्या या मुलीला पाहून डॉक्टरही अचंबित झाले. मुलीच्या शरिरावर दोन डोकी होती. दुसरे डोके पायाच्या बाजूला असून या डोक्यावर केस, डोळे, नाक, कान पूर्णपणे विकसीत झालेले नाहीत. या अवयवांचे फक्त चिन्ह डोक्यावर दिसत आहेत.
बाळ आणि बाळंतीण बाई दोघेही सुदृढ आहेत. परंतु जन्मानंतर बाळाला छतरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. बीएमओ हेमंत मरैया, संध्या शर्मा आणि सोनम मौर्य यांनी डिलिव्हरी केली. जन्मावेळी बाळाचे वजन 3.3 किलोग्राम भरल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


























































