
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी येथील पाथरी रोडवरील सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी चक्क प्रथमसत्र परिक्षेपासूनच वंचित ठेवले आहे. आधी फिस जमा करा, अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची धमकी दिली होती. अखेर प्रथमसत्र परिक्षेच्या पहिल्याच दिवशी ही धमकी प्रत्यक्षात उतरवीत जवळपास २०० विद्यार्थ्यांना परिक्षेलाच बसू दिल्या गेले नाही. यामुळे पालकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात शिक्षणधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी निवेदन दिले आहे. या संदर्भात मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी पालकांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली असून जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाथरी रोडवरील सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी शालेय तगादा लावला होता. या शाळेत पहिले ते दहावी इयत्तेपर्यंत शिक्षण घेत आहेत. या शाळेत २४ ऑक्टोबर पासून प्रथमसत्र परिक्षा सुरु झाली आहे. या विद्यार्थ्यांना या शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर क्लॅरिस यांनी या विद्यार्थ्यांना शाळेच्या विविध घटक चाचण्यांची शैक्षणिक शुल्क अदा न केल्याबद्दल परीक्षेला बसू देणार नाही, अशी धमकी दिली होती. ही धमकी प्रत्यक्षात अंमलात आणल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शैक्षणिक शुल्क अदा न केल्याच्या कारणावरुन इंग्रजी या विषयाच्या पेपरला चक्क या विद्यार्थ्यांना बसू दिले नाही. प्रत्यक्षात ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. आपले पालक फिस भरु शकत नाहीत, अशी धारणा विद्यार्थ्यांची होत असल्याकारणाने विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होण्याची भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या शाळेचे जवळपास २०० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात विशेष लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे साकडे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे.
या निवेदनावर अभिजित दशरथे, रवीकुमार माने, आनंद घोलप, रमेश सोनुने, अविनाश चिटाणीस, श्रीहरी आपटे, मनोज अग्रवाल, के.व्ही. गावंडे, एम.बी. झोल, रेखा अग्रवाल, जी.एम. सोनवणे, यु.बी. कऱ्हाळे, उज्वला डाखोरे, उषा लुबाळे, आशा लुबाळे, रणजित परिहार, अभिजित परिहार, संतोष चव्हाण, सूरज अग्रवाल, अकबर सिद्दीकी, शेख मलीक मोहम्मद, सय्यद मुद्दशीर स. रशीद, मो. मतीन, के.आर. मुलगीर, आनंत फुटाणे, दिलीप शिंदे, राजेश शर्मा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली मंगळवारी बैठक
जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी सेंट ऑगस्टीन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी प्रथमसत्र परिक्षेला बसू दिले नसल्याचा प्रकार गंभीर असून याप्रकरणी त्यांनी त्यांच्या कक्षात सर्व पालकांचे व शाळेच्या मुख्याध्यापिकेसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक मंगळवार, ३० रोजी बोलाविली आहे. या बैठकीस जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पालकवर्गातून करण्यात आले आहे.





























































