
स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवस आधी गुप्तचर यंत्रणांनी राजस्थानमध्ये मोठी कारवाई केली आहे. जयपूरच्या विराट नगर येथील रहिवासी कुलदीप आणि भिलवाडा येथील रहिवासी नारायण लाल यांना त्यांच्या गावात छापा टाकून अटक केली आहे. हे दोघेही पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट होते. गुप्तचर यंत्रणा आता दोन्ही आरोपींची बँक खाती तपासत आहे.
याआधी गुप्तचर यंत्रणांनी राजस्थानमध्ये आयएसआय एजंटला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. या आधारे गुप्तचरांनी कुलदीप आणि नारायण लाल यांना अटक केली. आरोपी कुलदीप हा पाली येथील दारूच्या ठेक्यावर सेल्समन म्हणून काम करायचा. आतापर्यंत झालेल्या चौकशीत नारायण लाल पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पैशाच्या लोभापायी त्याने पाकिस्तानी अधिकार्यांच्या सांगण्यावरून अनेक सिमकार्ड विकत घेतली. ज्यातून भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाठवली जात होती.
आरोपी कुलदीप हा पाकिस्तानातील एका महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. या महिला अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याने टोपण नावाने बनावट खाते तयार केले. महिलेच्या नावाने बनवण्यात आलेल्या या बनावट अकाऊंटवरून कुलदीप लष्कराच्या जवानांशी मैत्री करत असे आणि त्यांच्याशी बोलून गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सी आयएसआयला पाठवत असे. त्या बदल्यात त्याला पैसे मिळत असत.आरोपींना पैसे कोणी पाठवले हे कळण्यासाठी सध्या गुप्तचर अधिकारी या दोन्ही आरोपींच्या बँक खात्यांचा शोध घेत आहेत.




























































