
न्यायदानाचे कार्य बजावणाऱ्या दोन न्यायाधीशांना हायकोर्टाकडून 1 ऑक्टोबरपासून सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या आरोपात तर पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश इरफान शेख यांच्यावर अमली पदार्थाचे सेवन आणि तस्करी केल्याच्या आरोपाप्रकरणी हायकोर्ट प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली. याबाबत हायकोर्ट प्रशासनाकडून नोटीस काढण्यात आली आहे.
मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना इरफान शेख यांच्यावर अमली पदार्थ तस्करीचा आरोप होता तर आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रूझवर पार्टीला शेख उपस्थित होते, त्यांनीही नशा केली होती. हायकोर्टात यासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती, तर धनंजय निकम यांच्यावर आरोपीला जामीन देण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्र न्यायालय व हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. अखेर हायकोर्ट प्रशासनाने दोन्ही न्यायाधीशांच्या बडतर्फीचा आदेश काढला.