
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ ) प्रवाशाकडून दोन किलो हशीश जप्त केले. जप्त केलेल्या हशीशची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.
चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी नागरिकाकडून 19 किलो सुडोफेडरिन जप्त केले होते. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी सीआयएसएफने अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला. गुरुवारी सीआयएसएफचे अधिकारी मुख्य सुरक्षा परिसरात तैनात होते तेव्हा दोन संशयास्पद बॅगा या स्कॅनिंग मशीनमध्ये टाकल्या होत्या. स्कॅनिंग झाल्यावर त्या बॅगेची तपासणी केली पण त्या बॅगेमध्ये काहीच सापडले नाही. पण सीआयएसएफच्या अधिकाऱयांना त्या बॅगेवर संशय होता. त्यामुळे ती बॅग पुन्हा एक्स बीआयएस मशीनमध्ये टाकली तेव्हा एक संशयास्पद वस्तू सीआयएसएफ अधिकाऱ्यांना दिसली. ती बॅग पुन्हा तपासली असता त्यात 4 पॉकेटमध्ये लपवलेले हशीश सापडले. हशीश सापडल्यावर सीआयएसएफ अधिकाऱ्याने तारिक इरफान मन्सुरी आणि जहिरा मन्सुरीला ताब्यात घेतले. ते दोघे विमानाने दोहाला जाणार होते. एका व्यक्तीने ती बॅग आपल्याला दिल्याचे इरफानने चौकशीत सांगितले. या घटनेची माहिती एनसीबीला देण्यात आली. एनसीबीने ते हशीश जप्त केले. त्या दोघांना पुढील कारवाईकरिता एनसीबीच्या ताब्यात दिले.

























































