
सामना प्रतिनिधी, नागपूर
शहरातील महाल परिसरातील किल्ला रोड भागात सान्निध्य उरकुडे (6) याचा श्वसन नलिकेत फुगा अडकून मृत्यू झाल्या, तर अडीच वर्षीय तिथी मिश्राचा श्वसन नलिकेत केळी अडकल्याने श्वास गुदमरून अंत झाला. सानिध्यने तीन फुगे खरेदी केले. दोन फुगे आईने फुगवून दिले, तर संध्याकाळी तिसरा फुगा फुगवण्याचा प्रयत्न केला. पण तो फुटलेला असल्याने त्याने फुग्यापासून छोटा फुगा बनवणं सुरू केलं. त्याच प्रयत्नात जोरात श्वास घेतल्याने तो फुगा त्याच्या तोंडातून घशात गेला आणि श्वासनलिकेत अडकला. त्रास झाल्याने चिमुकल्या सान्निध्यने घरात धाव घेतली. पण त्यातच त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी येथील पारडी परिसरात अडीच वर्षांची तिथी नेहमीप्रमाणे शेजारच्यांच्या घरी खेळायला गेली. घरात पूजा झाल्यावर त्यांनी प्रसादाची केळी कुटुंबातील मुलांना आणि तिथीला खायला दिली. मात्र केळ्याच्या आकाराचा आणि स्वतःच्या क्षमतेचा अंदाज न आल्यामुळे तिथीने ते केळं आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं. पण केळ्याचा तो घास तिच्या श्वासनलिकेत अडकला. यामुळे तिला श्वास घेता न आल्याने तिलाही प्राणास मुकावे लागले.


































































