नरसीफाटा येथे भीषण अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा

नांदेडहून बिदरकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पो ट्रँव्हलर गाडीने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी नरसी-देगलूर दरम्यान शंकरनगर येथे घडली. मयत दोघे हे काका-पुतणे असून भोपाळा येथील रहिवाशी आहेत.

रामतीर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळा येथील हुसैन अमिनसाब शेख (50) हे शंकरनगर येथील एका विद्यालयात सेवकपदी कार्यरत होते. सध्या दहावीच्या परिक्षेला प्रारंभ झाल्याने शनिवारी सकाळी लवकरच हुसैन शेख हे आपला पुतण्या फेरोजसह दुचाकीने भोपाळा येथून शंकरनगरला आले होते. शंकरनगर येथील मुख्य रस्त्यावरून विद्यालयाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याकडे वळत असतानाच नांदेडहून प्रवाशी घेवून बिदरकडे जाणाऱ्या एका भरधाव टेम्पो ट्रँव्हलरने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील काका-पुतणे अक्षरशः चिरडले गेले. फेरोज शेख (20) याचा जागीच मृत्यू झाला, तर हुसैन अमिनसाब शेख यांनी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राण सोडले.