५ रूपयाच्या विडीसाठी आई वडिलांसमोर तरुणाची हत्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीमध्ये फक्त पाच रुपयांच्या विडीसाठी दोन जणांनी एका तरुणाची हत्या केली आहे. दिल्लीच्या नजफगडमधील लाल स्टेडियमजवळ असलेल्या झोपडपट्टीतील एका दुकानात दोन तरुण विडी घ्यायला आले. दुकानात दुकान मालकाची पत्नी होती. दोन तरुणांनी तिच्याकडे उधारीवर विडी मागितली. ती देण्यास नकार दिल्याने हे तरुण महिलेशी भांडायला लागले आणि तिला मारायला लागले. बाहेर सुरू असलेल्या गोंधळाचा आवाज ऐकून महिलेचा मुलगा गौरव आईच्या मदतीला धावला. गौरवने दोन्ही तरूणांना समजावण्याचा प्रयत्न केला.  दोघेही तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी गौरवला लक्ष्य करत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि चाकूने भोसकून त्याचा खून केला. गौरवला मारल्यानंतर तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. गौरव हा दत्तक पुत्र होता. त्याच्या मृत्यूने आई वडिलांना जबरदस्त धक्का बसला आहे.