
सामना ऑनलाईन । मुंबई
गोकुळ, महानंदा, अमूल, मदर डेअरी या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये पहाटेच्या अंधारात भेसळ करून ते भेसळयुक्त दूध नागरिकांना विकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने मुसक्या आवळल्या. त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून नामांकित दूध कंपन्यांच्या बनलेल्या बनावट पिशव्या तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
पंतनगर येथील गुरुनानक नगरात काही इसम नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ करून ते घातक दूध नागरिकांना विकत आहेत. याची तत्काळ गंभीर दखल घेत युनिट-7चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे, पोलीस निरीक्षक श्रीधनकर, उपनिरीक्षक अतिश लोहकरे, सुनयना सोनावणे व पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी गुरुवारी पहाटे सापळा रचला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास एका घरामध्ये नामांकित कंपनीच्या दुधामध्ये दूषित पाणी मिक्स करताना सत्या सीतारामालू पिट्टाला (40) आणि इनकन्ना जनाहे अली (43) हे दोघे रंगेहाथ सापडले. पोलिसांनी त्यांना अटक केली व घटनास्थळावरून 237 लिटर दूध, दूध कंपनीच्या नावे बनवलेल्या 75 बनावट पिशव्या व भेसळ करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य जप्त केले.
























































