गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या, आरोपीने केले धक्कादायक खुलासे

गोव्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन रशियन महिलांची हत्या करण्यात आली असून एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आली आहे. एलेक्सी लियोनोव असे आरोपीचे नाव असून त्याने अनेक हत्या केल्याचे कबूल केले आहे.

एलेक्सी लियोनोव हा त्याच्या प्रेयसीसोबत गोव्यात लिव्ह इनमध्ये राहायचा. शुक्रवारी त्याची प्रेयसी एलेना कस्थनोवा हिचा मृतदेह गोव्याच्या अरंबोलमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आढळला आहे. तिचा गळा कापला होता आणि तिचे पाठीमागून हात बांधले होते. शेजाऱ्यांनी किंचाळण्याचा आवाज ऐकून घरमालकाला त्याबाबत कळवले. त्यानंतर लियोनोव पहिल्या मजल्यावरुन खाली उडी घेत पळाला. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत पहाटे चारच्या सुमारास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने प्रेयसीची हत्या केल्याचे कबूल केले. पण त्याचबरोबर त्याने आणखी एका रशियन महिलेची हत्या केल्याचे कबूल केले. जिचा मृतदेह मोरजिव गावात सापडला.

गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुसरी महिला वानीवा हिची हत्या 14 जानेवारी रोजी झाली होती. दोन्ही हत्यांचे पॅटर्न एकाच प्रकारे होते. कसून चौकशी केली असता आरोपीने आणखीही अनेक हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये गोवाच नव्हे अन्य ठिकाणी जाऊन हत्या केल्याचे कबूल केले आहे. त्याने आसामच्या 40 वर्षीय महिलेचीही हत्या केल्याचेही सांगितले आहे. तिला नशेचे औषध देऊन तिला मारण्यात आल्याचे त्याने सांगितले. आरोपी त्याचे वारंवार जबाब बदलत आहे. कदाचित तो नशेच्या गुंगीत होता. त्यामुळे त्याने सांगितलेल्या गोष्टींचा तपास केला जात आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 2 रशियन महिलेंचे मृतदेह सापडले आहेत. तिसऱ्या प्रकरणाची पोस्टमॉर्टेम आणि पुराव्यांद्वारे अद्याप पुष्टी झालेली नाही. गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हत्येचे गुन्हे दाखल केले आहेत. पेरनेम येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन रशियन महिलांच्या हत्येप्रकरणी लिओनोव्हला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा हत्येतील शस्त्र आणि इतर फॉरेन्सिक तपशीलांसह पुरावे गोळा करत आहे. आरोपींच्या दाव्यांची पुष्टी झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.