बोलबच्चनगिरी करून पादचाऱ्यांची लुटमार, सराईत भामटय़ांना बेडय़ा

764

पादचाऱ्यांना रस्त्यात अडवून विनाकारण कोणतेही विषय काढून बोलण्यात गुंतवायचे. मग बोलत असताना शिताफिने समोरच्याचे किंमती ऐवज काढून पसार व्हायचे. अशा प्रकारे बोलबच्चनगिरी करून पादचाऱयांना लुटणाऱया दोघा भामटय़ांना शिवाजी पार्क पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले.

संजय मांगडे (47), राजू शेट्टि (42) अशी त्या सराईत गुन्हेगारांची नावं आहेत. दोघांनी पोर्तुगीज चर्च जवळ एका तरुणाला अडवले. मग पत्ता विचारण्याचा बहाणा करीत बोलण्यात गुंतवल आणि काही समजायच्या आत त्या तरुणाची सोन्याची चैन घेऊन पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.

घटनास्थळी सीसी टीव्ही नसल्याने पोलिसांनी खबऱयांचे जाळे पसरवले. आरोपी नशेबाज असून माटुंगा रेल्वे स्थानकातील ट्रकवर असल्याचे समजले. त्यानुसार एपीआय संजय जगताप, प्रमोद सुर्यवंशी, विठ्ठल जाधव, सागर तायडे, सतिश निमले, संदिप पाटील, सुधीर वशले, गोतमारे, साळुंखे, परदेशी, तावडे, रणदिवे, प्रदिप पाटील या पथकाने रेल्के ट्रकच्या दोन्ही बाजूला फिल्डींग लावली. पोलिस आल्याचे कळताच आरोपी पळू लागले. पोलिसांनी मग पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून चोरीची चैन हस्तगत केली. कोविडचा धोका असतानाही पोलिसांनी त्याची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींवर 40हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या