
बालाजीनगर आणि वारजे परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघेजण ठार झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास कृष्णाजी कदम (55, रा. धनकवडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुमार तुकाराम राख (26) याला अटक करण्यात आली आहे. किरण विलास कदम यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विलास काल दुपारी बालाजीनगरमधील के.के. मार्केट परिसरातून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी भरधाव डंपर चालकाने दिलेल्या धडकेत विलास गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.
दुसऱ्या अपघातात भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत अनोळखी ज्य़ेष्ठ नागरिक ठार झाला. हा अपघात 10 मार्चला रात्री पावणेदहाच्या सुमारास वारजे ब्रीजवर घडला. याप्रकरणी पोलीस नाईक विश्वनाथ गोणे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



























































