
दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथे रविवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली. अशोकनगर फाटा येथे बजाज कंपनीची मोटारसायकल व दुसरी हिरो होन्डा कंपनीची स्ट्रिट के फोर या विना नंबर असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टाकळीभान येथील दोघे गंभीर जखमी झाले. तर एकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्य करत घटनेची माहिती शहर पोलीस ठाणे यांना तसेच 108 क्रमांक रुग्णवाहिका यांना कळविली. जखमींना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला लोणी येथील पीएमटी रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने लोणी येथून पुणे येथे उपचारासाठी नेण्याची तयारी सुरु असतानाच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. वारंवार याच ठिकाणी अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

























































