परभणीत दुचाकी चोरांना अटक; 32 मोटरसायकल जप्त

परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोटारसायकल लांबविणाऱ्या चोरट्यांची टोळीतील चारजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 32 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला गजाआड केले आहे.

विशेष पथकाचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना खबऱ्यामार्फत त्यांना टोळीची माहिती मिळाली. त्याप्रमाणे जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर चौघेजण 2 दुचाकी घेऊन विक्रीसाठी येत असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने ईदगाह मैदानावर सापळा रचला. दोन मोटारसायकल व त्यावरील व्यक्ती वाट पाहत असून दोन मोटारसायकलवर दोन व्यक्ती शारदा महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीजवळ थांबले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी या पथकाने त्या दोन्ही मोटारसायकल आणि त्या व्यक्तींना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी खाक्या दाखवताच या चौघांनी चोरीच्या मोटारसायकल विक्रीस आणल्याचे कबूल केले. महादेव दिलीप घोगरे, विशाल रमेश इंगळे, शाम नामदेव हरकळ (तिघेही रा. रेणाखळी, ता. पाथरी) आणि कैलास बाबासाहेब शेळके (रा. उमरा, पाथरी) या चौघांची पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यांनी 32 मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. रेणाखळीतील शाम हरकळ यांच्या शेतात त्या मोटारसायकल ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

या चोरलेल्या मोटरसायकल परभणी, जालना, बीड, नांदेड, नगर व पुण्यातील आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक बापुराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारूकी, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, राहूल चिंचाणे, बालाजी रेड्डी, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, समीर पठाण, अरूण कांबळे यांनी ही कारवाई केली. या आरोपींनी अजून काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या