धक्कादायक….लॉकडाऊनध्ये आईला भेटण्यासाठी त्याने चोरली दुचाकी

लॉकडाउनमध्ये गावी असणाऱ्या आईला भेटण्यासाठी एका चोराने दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने त्याला पकडल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. सिद्धार्थ संतोष परदेशी (वय 29, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लष्कर परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीची माहिती कर्मचारी अब्दुल सय्यद आणि सुरेंद्र साबळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सिद्धार्थला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. नगर येथे आईला भेटण्यासाठी जायचे होते. पण लॉकडाउनमुळे वाहन मिळत नव्हते. त्यामुळे लष्कर भागातून दुचाकी चोरली. त्यानंतर आईला भेटून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर सिद्धार्थला दुचाकी चोरणे सोपे वाटल्याने त्याने पुन्हा त्याच परिसरातून आणखी एक दुचाकी चोरली. चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. यापूर्वी देखील त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, भालचंद्र बोरकर, शंकर पाटील यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या