केईएममधून दोन वर्षांच्या मुलाची चोरी, चार दिवस आपुलकी दाखवत केअर टेकरने केले कांड

दोन वर्षांच्या बाळाला त्याने सलग चार दिवस लळा लावला. तो आपल्या नातवाप्रति खूपच सहानुभूती दाखवतो असा समज बाळाच्या आजीला झाला. मग हीच संधी त्याने साधली. आजीची नजर चुकवून तो मुलाला केईएम इस्पितळातून घेऊन गेला. त्याने मुंबईची वेसदेखील ओलांडली, पण रेल्वे टीसीमुळे त्याचा कट उधळला गेला आणि बाळ पुन्हा मातेच्या कुशीत विसावले.

मूळची सुरतची व सध्या भिवंडी येथे राहणारी एक महिला गेल्या दीड महिन्यापासून केईएम इस्पितळात उपचारासाठी दाखल आहे. तिच्या दोन वर्षांच्या मुलाला तिची आजी तेथेच सांभाळत होती. मंगळवारी रात्री महिलेची तपासणी करायची असल्याने तिचे पती तिला घेऊन गेले. ते परतले असता आजीकडे बाळ नसल्याचे आढळले. तिला विचारले असता बाळ रडत होतं म्हणून त्याला शांत करण्यासाठी एकाने घेतले. तो इथेच होता, पण अजून परतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाच्या वडील व नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु ती व्यक्ती व त्यांचे बाळ न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनी बाळ व त्याला घेऊन गेलेल्या व्यक्तीचे छायाचित्र सर्वत्र जारी केले व कोणाला दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.

टीसीला संशय आला आणि…

आरोपी मुलाला लोकलने घेऊन जात होता. बाळ रडत असल्याने लोकलमध्ये टीसीला संशय आला. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून त्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. मग ठाणे रेल्वे पोलिसांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधल्यावर बाळ चोरीचा प्रकार उघडकीस आला.

केअर टेकरचे काम करत होता

अमोल उदलकर (42) असे चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा सिंधुदुर्गचा असून केईएममध्ये केअर टेकर होता. त्यामुळे बाळाच्या आजीला त्याचा संशय आला नाही. त्याचाच गैरफायदा घेत त्याने चोरी केली होती. अमोल विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो पत्नीपासून विभक्त राहतो.