टायपिंगचा आवाज ऐकून AI चोरतोय पासवर्ड

तुम्ही अनेक प्रकारच्या हॅकिंगबद्दल ऐकले असेल , परंतु तुम्हाला माहिती आहे का की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून पासवर्ड चोरला जाऊ शकतो. एआय तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांनी अशी एआय पद्धती विकसित केली आहेत, जी तुमचा पासवर्ड सहजपणे चोरू शकतात. तुम्ही करत असलेल्या टायपिंगचा आवाज ऐकून हे तंत्रज्ञान तुमचा पासवर्ड चोरू शकतो. हॅकिंग टाळण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो, मात्र त्यावर मात करण्याचा हॅकर्स नवनवीन मार्ग शोधून काढत असतात. आता तर तुम्ही करत असलेला टायपिंगचा आवाज ऐकून पासवर्ड चोरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

तुमच्या काँप्युटरवर पासवर्ड टाइप करताना तो इतरांना कळणार नाही याची काळजी घेतली तरी तुमचा पासवर्ड चोरला जाण्याची शक्यता आहे. ZDnet ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार हॅकर्स एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून, कीबोर्डचा आवाज तपासून तुमचा पासवर्ड चोरू शकतात. हॅकिंगच्या या पद्धतीला अकॉस्टीक साइड-चॅनल अटॅक म्हणतात . पासवर्ड हॅकिंगच्या या प्रकारात तुमच्या कीबोर्डमधून बाहेर पडणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित केले जाते. हॅकर्स आवाजाचे विश्लेषण करून तुमच्या सिस्टमचा पासवर्ड ओळखतात. यासाठी एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान तुम्ही टाइप केलेली अक्षरे आणि आकड्यांबद्दल अचूक माहिती देते. पासवर्ड चोरण्याची ही पद्धत किती धोकादायक आहे हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी MacBook Pro 16 Inch या विशिष्ट लॅपटॉपचा वापर केला. तज्ज्ञांनी एक आयफोन 13 मिनी लॅपटॉपपासून काही अंतरावर एका मऊ कापडावर ठेवला , जेणेकरून आवाज पकडता येईल. याशिवाय लॅपटॉपचे रेकॉर्डिंग फंक्शनही वापरण्यात आले होते. जमा झालेली माहिती वापरून एआय आधारित स्मार्ट कॉम्प्युटर प्रोग्राम तयार करण्यासाठी वापरली गेली. हा प्रोगार्मा टायपिंगचा आवाज ओळखण्याचे काम करत होता.

चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, या एआय प्रोग्रामची चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये, हा प्रोग्राम कोणत्या बटणाचा आवाज आहे हे अगदी सहजपणे शोधतो. अहवालानुसार, हा प्रोग्राम 95 टक्क्यांपर्यंत अचूक अंदाज लावतो. तज्ज्ञांनी हा धोका टाळण्यासाठीचाही मार्ग सांगितला आहे. आपण या प्रोग्रामची सहज फसवणूक करू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या टायपिंगची पद्धती बदलावी लागले. तुम्ही टायपिंग करताना SHIFT बटन दाबून या प्रोगामची दिशाभूल करू शकता. तुम्ही बॅकग्राउंड नॉईज जोडू शकता , जेणेकरून AI टूल तुमचा टायपिंग आवाज योग्यरित्या ओळखू शकणार नाही.