
19 वर्षांखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानच्या युवा संघाने आपला झंझावात कायम राखला. आजही त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाडयांवर वर्चस्व गाजवताना श्रीलंकेला सपशेल नांगी टाकायला भाग पाडले. श्रीलंकेने दिलेल्या 139 धावांच्या अत्यंत माफक आव्हानाचा पाठलाग हिंदुस्थानने केवळ 18 षटकांत दोन विकेट गमावत सहज पूर्ण केला आणि दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. आता युवा आशिया कपचा किताब जिंकण्यासाठी रविवारी हिंदुस्थानसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.
गेल्या तिन्ही सामन्यांत धावांचा पाऊस पाडणाऱया हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने सामना 20 षटकांचा खेळवण्यात आला. मात्र, हिंदुस्थानी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत श्रीलंकेचा डाव 20 षटकांत 8 विकेट्सवर अवघ्या 138 धावांत गुंडाळला. हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजांची काsंडी केली. श्रीलंकेकडून कर्णधार विमथ दिनसाराने 32, चमिका हिनाटीगालाने 42, तर सेठमिका सेनेविरत्नेने 30 धावांची झुंजार खेळी केली.
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. दुसऱयाच षटकात कर्णधार आयुष म्हात्रे (7) बाद झाला, तर वैभव सूर्यवंशी (9) लवकर माघारी परतल्याने दबाव वाढला. मात्र, एरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा या जोडीने संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत डाव सावरला. विहान मल्होत्राने 35 चेंडूंत अर्धशतक झळकावत नाबाद 61 धावांची खेळी केली, तर अॅरोन जॉर्जने 42 चेंडूंत नाबाद 58 धावा केल्या. या दोघांमधील शतकी भागीदारीमुळे हिंदुस्थानचा विजय निर्विवाद ठरला. या विजयानंतर हिंदुस्थानने अंतिम फेरी गाठली असून रविवारी पाकिस्तानविरुद्ध रंगणाऱया सामन्यात किताबासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.




























































