
सामना ऑनलाईन,ठाणे
ठाण्यात शिवसेनेच्या प्रयत्नाने अबोली रिक्षाच्या माध्यमातून रोजगार मिळालेल्या महिलांसाठी आणखी एक खूशखबर आहे. कधी पुरुष रिक्षाचालकांचे टोमणे तर कधी भाडय़ासाठी उन्हातान्हात ताटकळणाऱ्या अबोली रिक्षाचालक महिलांना आता हक्काचे प्रवासी मिळणार आहेत. उबेरशी अबोली रिक्षा कनेक्ट करण्यात आल्या असून या योजनेचे शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षा व्यवसायात घट्ट पाय रोवून उभ्या असणाऱ्या महिलांना उबेरच्या माध्यमातून सक्षम आधार मिळाला आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून राज्यात प्रथमच ठाण्यात महिलांसाठी रिक्षा व्यवसायाचे दालन खुले झाले. महिला रिक्षाचालक असलेल्या अबोली रिक्षांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीड वर्षांपूर्वी लोकार्पण झाले होते. सुरुवातीला 25 रिक्षा असलेल्या अबोली रिक्षाचालकांची संख्या आता वाढली आहे, परंतु अनेकदा या महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. रिक्षा थांब्यांवरही त्यांना उभे राहू दिले जात नव्हते. याची दखल घेत शिवसेना नगरसेविका नंदिनी विचारे यांनी या महिला रिक्षाचालकांना ऊन-पावसात ताटकळत उभे राहावे लागू नये, त्यांना हक्काचे भाडे मिळावे यासाठी उबेर कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर जगभरात उत्तम सर्व्हिस देणाऱ्या उबेरसोबत प्रथमच ठाण्यात अबोली रिक्षांना कनेक्ट करण्यात आले.
शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रायगड जिल्हाप्रमुख संजय मोरे, नगरसेविका नंदिनी विचारे, अशोक वैती, पूर्वेश सरनाईक, सिद्धार्थ ओवळेकर, संजय भोईर, उबेरचे चीफ बिझनेस ऑफिसर मधु कर्नन, जनरल मॅनेजर अभिनव पटवा, इरावती दामले आदी यावेळी उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल
ठाण्याच्या धर्तीवरच कल्याण-डोंबिवलीसह विदर्भ आणि मराठवाडय़ात उबेरने हा उपक्रम सुरू केला, तर तेथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना उत्पन्नाचे साधन मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तेजस्विनी बसेसमध्ये स्थानिक महिलांना कंडक्टर म्हणून सामील करावे, असा मुद्दा नगरसेविका नंदिनी विचारे यांनी मांडला तेव्हा कंडक्टरसोबतच लवकरच चालकही महिलाच दिसतील आणि त्याची सुरुवात ठाण्यातून होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.






























































