Darling! मी तुझ्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार ठेवली आहे… विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात महिला, तरूणींवर होणारे अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या घटनामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आलीए. लखनऊ विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक परमजीत सिंग यांना एका विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण केल्याच्या आणि तिला परीक्षेचा पेपर देण्याचे आमिष दाखवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्राध्यापक परमजीत सिंग एका बीएससी शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचे आणि त्या बदल्यात तिला परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत असल्याचे ऐकू येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून, तिने विद्यापीठ प्रशासनाकडे याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परीक्षा नियंत्रक विद्यानंद त्रिपाठी यांनी पोलिसांत प्राध्यापक परमजीत सिंग विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हसनगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून सिंग यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपी प्राध्यापकाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे आपल्याला या प्रकरणात अडकवण्याता प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू जे.पी. सैनी यांनी या प्रकरणाची दखल घेत अंतर्गत तक्रार समितीला 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक वातावरणाला धक्का लावणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये विद्यापीठ ‘झिरो टॉलरन्स’ म्हणजेच शून्य सहनशीलता धोरणाचे पालन करते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच प्रश्नपत्रिकेची गोपनीयता धोक्यात आणणे आणि विद्यार्थिनीचा विनयभंग करणे अशा दोन्ही गंभीर गुन्ह्यांसाठी प्राध्यापकाला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.